ती सहा महिन्यांनंतर पुन्हा आज आली आणि भेटून गेली. स्लीप डिस्क, वाढलेले वजन व वाढलेला बीपी, पायांवर आलेली सूज, नव्याने आलेली व्हेरिकोज व्हेन्स. हि यादी पुढे वाढणारी होतीच. योग वर्ग सुरू करण्यावर किती अडचणी येतात हे तिने मला आवर्जून सांगितले. योग वर्ग तूच घेणार का…..अशा सर्व चौकशीनंतर मी उद्यापासून क्लासला येते हे सांगून ती निघाली…..आणि पुन्हा काही काळासाठी गायब. …अशी अनेक मंडळी मला दररोज भेटतात.
काय बरी कारणे असावीत यांची? आपल्याला खरंच आत्मपरीक्षणाची गरज आहे का?
1. व्यस्त जीवनशैली
आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे सर्वसामान्य माणूसही अत्यंत बिझी झाला आहे. व्यवसाय किंवा नोकरी करणाऱ्यांसाठी कार्यालयीन ताण, कुटुंबाची जबाबदारी, प्रवास, वैयक्तिक जीवनातील विविध कार्य हे सर्व एकत्रित होऊन लोकांना योग साधनेसाठी वेळ मिळणे कठीण जात आहे. घराची काळजी घेणारी स्त्री कौटुंबिक जबाबदारीमुळे स्वतःच्या आरोग्यांसाठी जराही वेळ देताना दिसत नाही आहे.
2. स्वप्रेमाचा अभाव व इतर कामांमध्ये स्व आरोग्याला महत्त्व न देणे
अनेक जण स्वप्रेमाचा अभाव व इतर कामांमध्ये स्व आरोग्याला महत्त्व न देणे, सर्वोतोपरी दुर्लक्ष करणे यामुळे योगाच्या साधनेपासून दूर राहत आहेत. आपल्या शरीरामध्ये अनेक शारीरिक संस्था, प्राणिक संस्था, पंच प्राण, सप्तचक्र, पंच महाभूतांशी निगडित आरोग्य संस्था कार्यरत आहे ती मरेपर्यंत सुदृढ ठेवायची आहे, काळजी घ्यायची आहे व आजारांपासून दूर राहायचे आहे. हे माझे परम कर्तव्य आहे या गोष्टीसाठी सजगता, जागरूकताच मुळातच कमी आहे.
3. कामाच्या प्राधान्यतेचा गोंधळ
बऱ्याच लोकांच्या प्राधान्यते मध्ये आरोग्य हा विषय येतच नाही. समजा आला तरी अनेक लोकांना योगसाठी वेळ काढणे अवघड वाटते. जिथे आवड तिथे सवड हे मात्र पूर्णपणे विसरले आहेत.
4. मी healthy आहे.
मला याची गरजच नाही आहे. तहान लागल्यावर विहीर खोदणारी ही माणसे. गहू तेंव्हा पोळ्या वाली कॅटेगरी
अनेकांना वाटते की ते आधीच निरोगी आहेत आणि त्यांना योगची गरज नाही. तहान लागल्यावर विहीर खोदणारी ही माणसे. गहू तेंव्हा पोळ्या वाली कॅटेगरी. परंतु योगाचे दीर्घकालीन फायदे लक्षात घेता केवळ आजच्या आरोग्याच्या स्थितीसाठीच नाही तर भविष्यातील आरोग्यासाठीही योग करणे खूप आवश्यक आहे. विचार त्यांच्या मनाला शिवतच नाही.
5. स्वयं प्रेरणेचा अभाव
स्वयं प्रेरणेचा,अंतर प्रेरणेचा, उत्साहाचा अभाव असणे हे ही एक कारण आहे. अशी मंडळी योगसाधना न करण्याची अनेक कारणे सांगून वेळ मारून नेतात.
6. सुरक्षाकवच न सोडण्याची वृत्ती
काही जण सुरक्षाकवच न सोडण्याच्या वृत्तीचे, आरामदायी जीवन शैलीचे बळी ठरलेले दिसतात. शरीराला व मनाला मुरड घालून आरोग्याच्या नवीन गोष्टी स्वीकाराला त्यांची मानसिकता नसते.
7. मानसिक व शारीरिक आळस
काही मंडळी मानसिक व शारीरिक आळसामुळे योग व आरोग्यासाठी जराही सक्रिय नसतात.
8. मला सगळं येतंय, मी योग घरी करणार
सोशल मीडियाला नियमित फॉलो करणारी अजून एक वेगळी कॅटेगिरी आहे जी इन्स्टा youtube, google वर आसने बघून मला सर्व येते, सर्व जमते, मी योग घरी करणार.. अशा लोकांचे स्वास्थचे ध्येय अल्पकालीन असते. प्रदीर्घ स्वास्थ्याचा विचारच नसतो.
9. स्वतःबद्दल गैरसमज
काही मंडळींचा हा समाज असतो… मी आसन या अगोदर केली नाही आणि ते मला जमणारच नाहीत… संपूर्ण नकारात्मकता.
बघा बर स्वतःला तपासून वरीलपैकी कुठल्या कारणांमुळे आपण आरोग्याची हेळसांड करत आहोत. यावरचे काही उपाय पाहूया का?
उपाय: योग विषयक जागरूकता कशी तयार करावी?
1. एक तास स्वप्रेमासाठी
सर्वप्रथम २४ तासांमध्ये एका तास स्व प्रेम, स्व आरोग्य, स्व काळजीसाठी सकाळ किंवा संध्याकाळची निश्चित करा व त्या एका तासामध्ये अर्धा तास, आसने, पंधरा मिनिटे प्राणायाम व पंधरा मिनिटे ध्यानधारणेसाठी नक्की करा. सातत्य हा गुरुमंत्र आहे. तुम्ही जे काय करत आहात त्याच्यामध्ये सजगतेने व जागरूकतेने न थांबता योगसाधना करा.
2. दररोज देहशुद्धी
दररोज अंघोळ करून मैल कचरा काढून जसे शुद्ध होतो तसेच योग मधून शरीरताण व मनावरचा भार कमी करा, देहशुद्धी प्राणशुद्धी होऊन दररोज मोकळे व्हा. बघा कसं दररोज ताजतवानं उत्साही वाटायला होतं.
3. आरोग्यदायी सहवास
तुम्ही अशा संस्थेच्या, मंडळींच्या अथवा ग्रुपच्या सहवासात रहा जे तुम्हाला सातत्याने आरोग्यदायी राहण्यासाठी प्रोत्साहन व समर्थन देतील. त्यांचे मार्गदर्शन व सहवास तुम्हाला दररोज योगा साधना करण्यासाठी प्रेरणा देत राहील.
4. योगाच्या कार्यशाळा
योगाच्या कार्यशाळा आणि शिबिरांना नक्की उपस्थित रहा. योग आसने, प्राणायाम वा ध्यान धारणेसाठी तंत्रशुद्ध शिक्षण – मार्गदर्शन चांगल्या शिक्षकांकडून घ्या व स्व प्रेरणेने योगसाधना करा.
5. योगाची पुस्तके व लेख
योग संदर्भात काही पुस्तके व लेख वाचनात ठेवल्यास तिथूनही प्रेरणा घेता येणे शक्य आहे. योगाच्या शारीरिक आणि मानसिक फायद्यांबद्दल जागरूकता वाढेल, दीर्घकालीन फायद्यांचे महत्त्व पटेल, प्रोत्साहन आणि समर्थन मिळेल.
6. शालेय अभ्यासक्रमात योग हा विषयाचीअंतर्भूतता-
मला एक मात्र कळकळून वाटते की शालेय अभ्यासक्रमात योगाची फिलॉसॉफी समाविष्ट झाली पाहिजे एक स्वतंत्र विषय म्हणून, असे असेल तर आरोग्याचे बाळकडू हे लहानपणापासून दिले जाईल. योग साधने बद्दलची हेळसांड संपुष्टातील येईल. सर्व सुखी, सर्व आरोग्याजनक होतील.
निष्कर्ष
योगाचे महत्त्व कळूनही साधनेपासून दूर राहणाऱ्या लोकांना जागरूक करण्यासाठी सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे. योगाच्या शारीरिक आणि मानसिक फायद्यांबद्दल जागरूकता वाढवणे, दीर्घकालीन फायद्यांचे महत्त्व पटवून देणे, प्रोत्साहन आणि समर्थन मिळवणे, कार्यशाळा आणि शिबिरांना उपस्थित राहणे, योग्य मार्गदर्शन घेणे आणि शालेय शिक्षणात योगाचा समावेश करणे हे काही उपाय आहेत ज्यामुळे लोक योग साधनेच्या मार्गावर चालू शकतील.
डॉ. श्वेता वर्पे
एक अरोग्याझरा
९३३८२०९८९